Tuesday, March 2, 2010



"

"मराठी तरुणा, एसएससी उत्तीर्ण हो"

‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ मार्फत घेतली जाणारी कंबाइण्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन २०१० ही परीक्षा म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेत जाण्याचा राजमार्ग आहे. अधिकाधिक मराठी तरूणांनी या परीक्षेला बसून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी व्हायला हवे.

‘मराठी तरुणा, एसएससी उत्तीर्ण हो’ हा मथळा वाचून दचकलात ? ‘स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत घेतली जाणारी कंबाइण्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन २०१० ही परीक्षा म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेत जाण्याचा राजमार्ग आहे. अधिकाधिक मराठी तरूणांनी या परीक्षेला बसून गुणवत्तेच्या जोरावर यशस्वी व्हायला हवे.तुमचा गोंधळ दूर व्हावा म्हणून सुरुवातीलाच स्पष्ट करूया की, ही ‘एसएससी’ म्हणजे आपल्या माध्यमिक शालांत मंडळाची दहावीची परीक्षा नाहीये, तर ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’ मार्फत घेतली जाणारी कंबाईण्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन २०१० ही परीक्षा आहे. या परीक्षेमार्फत केल्या जाणाऱ्या नोकरभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. पण दुर्दैवाने या जाहिरातीकडे मराठी तरुण-तरुणींचे पुरेसे लक्ष वेधले गेलेले नाही. म्हणून हा लेख..
स्टाफ सिलेक्शन कमिशन हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील कर्मचारी नियुक्त करण्यासाठी बनवलेला आयोग आहे. मुख्यत्वेकरून अराजपत्रित वर्ग ‘ब’ व वर्ग ‘क’ (टेक्निकल पदे सोडून) यातल्या साऱ्या पदांकरिता स्पर्धात्मक परीक्षांद्वारे योग्य गुणवत्ताधारक व्यक्तींची निवड करणे हे या आयोगाचे कार्य आहे. वर्ग ‘अ’मधल्या पदांकरिता कर्मचारी नियुक्त करण्याची जबाबदारी यूपीएससीवर आहे. त्याखालील सर्व पदांसाठीच्या नियुक्त्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच करते. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारी सर्व मंत्रालये, पोस्ट विभाग, आयकर विभाग, सीबीआय, सेंट्रल एक्साईज व कस्टम्स, प्रवर्तन निदेशालय, ऑडिट विभाग, सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन (उदा. बीएसएफ किंवा सीआयएसएफ) या सर्व विभागांमधला अ वर्ग वगळता साऱ्या नियुक्त्या एसएससीच्या शिफारशीने होतात. प्रशासकीय व्यवस्थेतील असिस्टंट, इन्स्पेक्टर, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, डिव्हिजनल अकाऊंटंट, ऑडिटर्स, सबइन्स्पेक्टर्स अशा प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या पदांसाठी एसएससीची स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होणे हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून ‘मराठी तरुणा, एसएससी उत्तीर्ण हो’!
सहाव्या वेतन आयोगानंतर या सर्व पदांना घसघशीत वेतनश्रेणी लाभलेली आहे. इतकेच नव्हे तर या साऱ्या पदांकरिता (अकाऊंट्स संदर्भातल्या सेवा वगळता) केवळ ग्रॅज्युएशन ही एकमेव पात्रता आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या (आणि



देशातल्या) कुठल्याही ज्ञानशाखेचा पदवीधर युवक अथवा युवती या परीक्षा देऊन सरकारी विभागात चांगल्या पदावर काम करण्याचे आपले स्वप्न साकार करू शकतो.
पण हे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम हाच एकमेव राजमार्ग असल्याचे ध्यानात असू द्या. मुळात या साऱ्या परीक्षा ज्या पदांसाठी निवड करत आहेत, ती सारी पदे आकडेमोड व माहितीचा वापर करून त्यानुरूप निर्णय घेणे या क्षमतांवर भर देणारी आहेत. या क्षमतांना तासून तासून तल्लख करणे हीच या परीक्षेतल्या यशाची गुरुकिल्ली आहे. अतिशय छोटय़ा छोटय़ा गावांतून ओरिसा, बंगालसारख्या राज्यांतूनही मुले या पदावर निवडून येत आहेत ते अशा नियोजनबद्ध अभ्यासानेच, हे आपण कधी मान्य करणार आहोत? आणि मान्य केले तर, त्यावर इलाज कधी करणार आहोत?

परीक्षेचे बदललेले स्वरूप-
यंदाच्या परीक्षेच्या आधी झालेल्या पूर्व परीक्षेच्या स्वरूपात २०० मार्काचा एकच पेपर असे व त्याचे बुध्दिमापन चाचणी (५० गुण), सामान्य ज्ञान (५० गुण), अंकगणित (१०० गुण) असे विभाजन असे. अर्थातच अंकगणितात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारडे आपोआप जड होई. आता मात्र एसएससीने पूर्व परीक्षेला टायर-१ असे नाव दिले आहे. त्यानुसार, १६ मे २०१० रोजी होणाऱ्या परीक्षेत चार भाग असणार आहेत-
१. सर्वसामान्य बुध्दिमापन- ५० गुण.
२. सर्वसामान्य ज्ञान- ५० गुण.
३. अंकगणितीय क्षमता- ५० गुण.
४. इंग्रजी आकलन- ५० गुण.
संपूर्णपणे बहुपर्यायी असलेल्या या २०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेत आता ‘इंग्रजीचे आकलन’ हा भाग नव्याने समाविष्ट झाला असून ५० गुणांचे अंकगणित कमी झाले आहे. खरं तर, हा बदल महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सकारात्मकच म्हणायला हवा, कारण उत्तर भारतीय विद्यार्थ्यांचे इंग्रजी मराठी विद्यार्थ्यांपेक्षा कच्चे असल्याचा सर्वसाधारण अनुभव आहे!
बुद्धिमापन
पहिल्यांदा जाहिरातीत दिलेला प्रत्येक विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम काळजीपूर्वक वाचून घ्या. बुद्धिमापन चाचणीच्या घटकासाठी व्हर्बल व नॉन-व्हर्बल रिझनिंगवर उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास जरुरी आहे. ‘अग्रवाल’ यांच्या पुस्तकांचा त्याकरता अभ्यास करता येईल. गेल्या तीन-चार वर्षांतल्या या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका त्या पुरेसे दिशादिग्दर्शन करू शकतील.
अंकगणित
अंकगणिताचा विभाग गुणांच्या हिशेबाने अध्र्यावर आला असला तरी त्याचे या परीक्षेतले महत्त्व अजिबात कमी होत नाही. पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विभाग केवळ आणि केवळ सरावावर अवलंबून आहे. प्रत्यक्ष आकडेमोड न करता शॉर्टकट्स वापरून योग्य उत्तरापर्यंत पोहोचणे शक्य असते. ज्याला ही सिध्दी जमली, त्याला एसएससीची किल्ली सापडलीच म्हणून समजा.
दहावीनंतर अंकगणिताशी काही संबंध आला नसेल तर परीक्षार्थीने या विभागावर जास्तीत जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. गणिताच्या मूलसूत्रांचा अभ्यास जर व्यवस्थित केला तर वरवर कठीण वाटणारी उदाहरणेही सहज सोडवता येतील. त्यात घाबरण्यासारखे काहीच नाही.
इंग्रजी आकलन
इंग्रजीच्या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्या व्याकरणाइतकेच महत्त्व इंग्रजीच्या उपयोजित अभ्यासाला द्यायला हवे. विशेष करून बॅंकिंगच्या परीक्षेत अशा स्वरूपाचे इंग्रजीच्या ज्ञानावरचे प्रश्न विचारण्यात येतात. त्या स्वरूपाचीच काठिण्यपातळी एसएससीच्या परीक्षेतही अपेक्षित आहे. त्यासाठी विशेषकरून व्याकरणाच्या भागासाठी रेन-मार्टिनचा योग्य वापर आणि संदर्भाकरता गेल्या तीन-चार वर्षांच्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचाही वापर करता येऊ शकेल.
सामान्य ज्ञान
सामान्य ज्ञानाच्या अभ्यासासाठी एसएससीने आखून दिलेली लक्ष्मणरेषा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. या विषयाच्या अध्ययनात ताज्या घडामोडी, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, संस्कृती, अर्थशास्त्र, विज्ञान या साऱ्या ज्ञानशाखांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केल्यास असे जाणवेल की, सेंट्रल बोर्डाच्या (एनसीईआरटी) इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या या ज्ञानशाखांच्या पुस्तकांचा अभ्यास त्याकरिता पुरेसा ठरू शकेल. तसंच ताज्या घडामोडींसाठी ‘हिंदू’, ‘इंडियन इक्स्प्रेस’ तसंच मराठीत ‘लोकसत्ता’ यांसारख्य़ा वर्तमानपत्रांचा वापर करता येईल. अर्थात, एसएससीच्या परीक्षेचा भर मुख्यत्वेकरून घटना आणि त्यातले ठळक मुद्दे यांवर असेल, त्यांच्या विवेचनावर नसेल हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावे.
मुख्य परीक्षा
परीक्षा मंडळाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळलेल्या परीक्षार्थीना अजून एक समाधानाची बाब म्हणजे यावेळेस एसएससीने त्यांच्या मुख्य परीक्षेची तारीखही त्याच जाहिरातीत जाहीर केली आहे. मुख्य परीक्षा (Tier 2)३१ जुलै व एक ऑगस्ट २०१० रोजी घेण्यात येणार असून सर्वसाधारण पदांसाठी तिचे स्वरूप असे असणार आहे-
१) संख्यात्मक गुणवत्ता- २०० गुण १०० प्रश्न- दोन तास. (बहुपर्यायी स्वरूप)
२) इंग्रजी आकलन- २०० गुण- १०० प्रश्न- दोन तास.
मुख्य परीक्षेतही इंग्रजी व गणित या विषयांवरील उमेदवाराची पकड तपासली जाणार असली, तरी प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असणार आहेत आणि प्रश्नांचा स्तरही, साहजिकच, थोडा वरचा असेल. इंग्रजीकरिता वाक्यातील चूक ओळखणे, योग्य शब्दांनी गाळलेल्या जागा भरणे, समानार्थी, विरूद्धार्थी शब्द, वाक्य पूर्ण करणे, योग्य स्पेलिंग व व्याकरणाचा अभ्यास तसंच वाक्प्रचार व म्हणी यांचा अंतर्भाव असेल.
गणिताकरिता पुन्हा संख्या व संख्या मालिका, गणिती क्रिया, टक्केवारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, व्याज, नफा, तोटा, आकृत्यांचा वापर, क्षेत्रफळ, घनफळ, काळ-काम-वेग इ. विषयांवरील मूलभूत मुद्दय़ांना स्पर्श करणारी गणिते विचारली जातील. या गणितांची काठिण्यपातळी तुलनेने जास्त असली तरी वेळेच्या सूत्रात गडबड होऊ न देता ती सोडवणे कठीण ठरू नये. काही कठीण प्रश्नांच्या तयारीसाठी बॅंकिंग अथवा मॅनेजमेंट परीक्षांच्या तयारीसाठी वापरली जाणारी पुस्तकेसुद्धा वापरता येतील.
मुलाखत
पूर्व परीक्षेतील २०० गुण व मुख्य परीक्षेतील ४०० गुण यांच्या एकत्र जोडणीतून उमेदवारांची ळ्री१ 3 साठी म्हणजे मुलाखतीसाठी निवड होईल. मुलाखतीला १०० गुण आहेत. खरं तर ही मुलाखत ‘मुलाखत’ नसून व्यक्तिमत्व चाचणी असते. साधारणपणे अर्धा तास चालणाऱ्या या व्यक्तिमत्त्व चाचणीत उमेदवारांची पाश्र्र्वभूमी, त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या समस्यांवरची त्याची पकड, हजरजबाबीपणा, उत्तरे पेश करण्याची ढब तसंच अभ्यासेतर विषयांमधली त्याची गती अशा विविध विषयांवर प्रश्न विचारले जातात. इंग्रजीत बोलण्याच्या गंडामुळे मुलाखतीला बरेच उमेदवार टरकून असतात. पण सराव आणि प्रयत्न यांच्या बळावर मुलाखतीतही अगदी भरपूर गुण मिळू शकतात.
या सर्व टप्प्यांतून पार झाल्यावर एसएससीतर्फे एक सामायिक गुणवत्ता यादी जाहीर होईल. उमेदवारांचे गुण आणि त्यांनी सव्र्हिसेसना दिलेला पसंतीक्रम यानुसार त्यांची वेगवेगळ्या पदांसाठी निवड होईल.

अशी संधी पुन्हा नाही!
आज हजारोंच्या संख्येने भरल्या जाणाऱ्या पोस्ट्स साधारणपणे येत्या तीनेक ़वर्षांत रोडावणार आहेत. येत्या एक दीड वर्षांत इन्कम टॅक्स, सेंट्रल एक्साईज या विभागांमध्ये पुनर्नवीकरण होणार असून काही नव्या जागा शेकडय़ात भरल्या जातील. पण त्यानंतर पुढची सात-आठ वर्षे अशी सुवर्णसंधी मिळणार नाही, असा जाणकारांचा अंदाज आहे. शिवाय सध्याच्या माहितीच्या अधिकाराच्या युगात स्पर्धात्मक परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्याला नक्की किती गुण मिळाले, आपल्याबरोबरच्या इतर विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले, कट-ऑफ नक्की किती होता, ही सगळी माहिती मिळू शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत मोठी पारदर्शकता आली आहे.

जागे व्हा!
स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या कंबाइण्ड ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन २०१० साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख तीन मार्च २०१० आहे.


(टिम लोकप्रभा कडुन साभार !!!)

मुळ लेखासाठि इथे जा...http://www.loksatta.com/lokprabha/20100305/spardha-exam.htm